मी कशाला जगतोय.?

बागेत जा, एखाद्या गुलाबाच्या झाडाला, एखाद्या मोगर्‍याच्या रोपट्याला विचारा,
‘कंटाळा कसा येत नाही तुला, सारखी तीच ती फुलं. त्याच त्या रंगाची, त्याच त्या वासाची. वर्षांनुर्वे तेच. उपयोग काय त्याच त्या गोष्टीचा.’
ते झाड हसेल. म्हणेल, ‘अरे, कंटाळा कसा येईल? ही फुलं फुलवणं. सुगंध वाटणं, सुंदर दिसणं आणि आपण सुंदर आहोत, हेच आपलं काम हे मान्य करणं, हेच माझं जगणं म्हणून स्वीकारणं, यात कंटाळा यायचं काय कारण आहे.’
आपण गप्पं बसावं आणि सरळ एखाद्या नदीकाठी जावं. तिचा तोच खळखळाट, तोच प्रवाह. आपण विचारावं तिला, ‘कशाला इतकी उधाणतेस? उपयोग काय तुझ्या उधाणाचा, या खळखळून वाहण्याचा, या खळखळाटाचा? आणि एवढं करून करतेस काय तर ठरलेल्या वाटेनं वाहत शेवटी सम्रुद्राच्या खार्‍या पाण्यात हरवूनच जातेस ना.?’
नदी खळाळून वाहत म्हणेल, ‘मी ‘उपयोगी’ बनण्याचा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतेय असं कोण म्हणालं, मी नदी आहे आणि मी फक्त नदीसारखं वागण्याचा प्रयत्न करतेय इतकंच.’
आणि मग संतापून देवालाच विचारावं, कशाला रे हा एवढा घोळ घालून ठेवलास, उपयोग काय या सार्‍याचा.
तो म्हणेल ‘ उपयोग नाही कसं? माझ्यादृष्टीनं तर झाडावरून पडणारं प्रत्येक पानही महत्त्वाचं आणि उपयोगीच आहे. तुझ्या डोक्यावरचा केस आणि हवेतला डोळ्यांनी न दिसणारा जीवाणूही त्याचं त्याचं कामच करतोय. ’
मग आपण स्वत:लाच विचारावं, ‘पण माझं काय, माझा आहे काही उपयोग? मी कशाला जगतोय.?’
खरं सांगू जे नदीनं, जे फुलझाडानं, जे देवानं सांगितलं ते लक्षात ठेवलं तर हा प्रश्नच पडणार नाही.
‘आपण ‘युजफूल‘-उपयुक्त आणि उपयोगी व्हायचा प्रयत्न करणं सोडून, आपण ‘आपण’ म्हणून सहज जगायल लागलं पाहिजे, त्या जगण्याचा होईलच कुणाला न कुणाला उपयोग. म्हणून मग आपण जसे आहोत तसे जगावं, आपण कशाला गुलाब व्हायचं, नदी व्हायचं नी देव व्हायचं, आपण जे आहोत ते जगलो. की, जगलोच आपण आपल्या आनंदासाठी!
-सुप्रसिद्ध लेखक पाऊलो कोईलो
यांच्या ब्लॉगवरची एक नोंद
Advertisements